Untitled 1

ब्लॉगींग टिप 6 : विजेटचा आणि जाहिरातींचा अतिवापर टाळा

ब्लॉगर, वर्डप्रेस सारख्या साईटसचे ब्लॉगधारक आपल्या ब्लॉगवर अनेक प्रकारची विजेटस टाकतात. खरं तर अशी विजेटस वापरलीच पाहिजेत असा काही नियम नाही. ब्लॉग वाचनाच्या दृष्टीने सुटसुटीत असला पाहिजे. एकादे विजेट वापरताने ते खरोखरच उपयोगी आहे का (तुम्हाला किंवा वाचकांना) ते नीट पारखून पहा. काही विजेटस नुसती जागा अडवतात त्यांचा ब्लॉगच्या दृष्टीने फारसा उपयोग नसतो. उदाहरणार्थ जर तुम्ही मराठीतूनच लिहित असाल तर जगभरातून कोठून कोठून तुमच्या ब्लॉगचे वाचक आले आहेत हे कळण्याने फारसा उपयोग होत नसतो. अशी माहिती तुम्हाला हवीच असेल तर Google Analytics चा वापर तुम्ही करू शकता. जर तुमचा ब्लॉग तुमच्या स्वतंत्र डोमेनवर असेल तर तुमचा होस्ट तुम्हाला वेब स्टॅटिस्टिक्सची सोय देत असणारच. तीचा वापर करा.

असेच अजुन एक विजेट म्हणजे वाचकसंख्या दाखवणारे विजेट. पूर्वी असे काऊंटर लोकप्रिय होते पण काळानुसार ते तितकेसे लोकप्रिय राहिलेले नाहीत. किंबहुना काही वेळा ते तुमच्या ब्लॉगसाठी नकारात्मकरित्याही कार्य करू शकतात. समजा की तुमचा ब्लॉग सुरू करून एक वर्षाचा कालावधी लोटला आहे पण काही कारणाने त्याला अजुन म्हणावा तसा वाचक वर्ग लाभलेला नाही. अशा वेळी ब्लॉग सुरू करून वर्ष झाले पण काऊंटर दाखवत असलेली वाचकसंख्या मात्र अगदी कमी असे नकारात्मक चित्र उभे रहाते.

चॅट विजेटसही फारशी उपयोगी पडत नाहीत. फ़्लॅश मधे बनवलेली, काहितरी ऍनिमेशन दाखवणारी, गेम्स विजेटही वाचकाचे लक्ष विचलीत करतात. वाचक तुमच्या नोंदी वाचण्यासाठी तुमच्या ब्लॉगला भेट देत असतो विजेट बघण्यासाठी नाही हे लक्षात ठेवा.

जर तुम्ही फेसबुक किंबा ट्विटर बॅगेज दाखवत असाल तर हे पाहणे आवश्यक आहे की ब्लॉगवरील नोंदी, ट्विटरवरील नोंदी आणि फेसबुक पेजवरील नोंदीं यांत किती फरक आहे. जर हा फरक नगण्य असेल (म्हणजे तुम्ही फेसबुक आणि ट्विटर केवळ ब्लॉग अपडेटस पाठवण्यासाठी वापरत असाल) तर तेच तेच मथळे सर्व ब्लॉगभर पाहून वाचक कंटाळू शकतो.

जाहिरातींच्या अतिवापराबाबतही हेच तत्व पाळणे योग्य ठरते. अति भडक, पॉपअप विंडो किंबा ब्राऊसरची नवीन विंडो उघडणार्‍या, आकाराने मोठ्या, ऍनिमेशन दाखवणार्‍या जाहिराती वाचकाचे लक्ष नोंदीवरून विचलित करू शकतात. तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी.


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+

Posted On : 13 Oct 2010


Tags : संगणक आणि इंटरनेट

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates