Untitled 1

ब्लॉगींग टिप 3 : नोंदींचा दर्जा नोंदींच्या संख्येपेक्षा महत्वाचा

अनेकदा ब्लॉग लेखकाचा असा समज असतो की रोज वा 3-4 दिवसांनी ब्लॉगवर नोंद टाकलीच पाहिजे. आता अशा नोंदींनी ब्लॉग "जीवंत" वाटत असला तरी ब्लॉगींगचा असा कोणताही कडक नियम नाही. आपण लवकर नोंद टाकली नाही तर वाचक काय म्हणतील, आपला वाचकवर्ग दुरावेल, ब्लॉगच्या हिटस कमी होतील अशा एक ना अनेक शंका ब्लॉग लेखकाच्या मनात असतात. ब्लॉगचा बाबतीत नेहमी असे म्हटले जाते की Content is the King. याचाच अर्थ तुम्ही किती नोंदी टाकताय या पेक्षा त्या नोंदींचा दर्जा काय आहे ते जास्त महत्वाचे. तेव्हा प्रत्येक ब्लॉगरने उपलब्ध वेळ, नोंदींची संख्या आणि दर्जा यांचे समीकरण लक्षात घेऊन स्वतःच्या ब्लॉग़ींगची Frequency ठरवावी. केवळ दुसरा कोणीतरी रोज लिहितो म्हणून आपणही तसेच करण्याचा आटापिटा करू नये.

येथे "दर्जा" म्हणजे भाषेचे सौंदर्य असा अर्थ अभिप्रेत नाही. ज्या विषयाबद्दल तुम्ही लिहित आहात तो तुम्ही किती समर्थपणे हाताळलेला आहे ते सर्वात महत्वाचे. एखादा कडक इस्त्रीचे कपडे घातलेला, टाय लावलेला सेल्समन फाडफाड इंग्रजी बोलतो पण आपल्याला त्याच्याकडून काही विकत घ्यावे असे वाटत नाही पण एखादा गावंढळ वाटणारा विक्रेता त्याच्या तोडक्यामोडक्या भाषेत काही सांगतो आणि आपल्याला ती वस्तु लगेच घ्यावीशी वाटते. तोच प्रकार ब्लॉग लेखनाच्या बाबतीतही आहे. केवळ भाषेचे सौंदर्य तुमच्या ब्लॉगला तारून नेऊ शकत नाही. तुमचे विषय हाताळण्याचे कसब सर्वात जास्त महत्वाचे आहे. तेव्हा अमक्या अमक्या नोंदी टाकल्या यातच समाधानी न रहाता प्रत्येक नोंदीचा दर्जा कसा सुधारता येईल ते पहावे. प्रत्येक नोंद टाकण्यापूर्वी त्रयस्थपणे ती वाचून पहावी. आवश्यक वाटल्यास फेरफार करावेत आणि मगच ती प्रकाशित करावी.

नोंदी वाढवण्याच्या नादात लेखकाला कधी कधी खुप छोट्या नोंदी टाकण्याचा मोह होतो. नोंदींची लांबी सर्वस्वी विषयावर अवलंबून असते हे खरे पण स्वतःच स्वतःसाठी काहीतरी मर्यादा ठरवून घ्यावी. दोन चार ओळींची नोंद टाकण्यापेक्षा दोन-तीन छोट्या नोंदी एकत्र करता येतील का ते पहावे.


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+

Posted On : 10 Oct 2010


Tags : संगणक आणि इंटरनेट

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates