Untitled 1

ब्लॉगींगची दहा वर्षे आणि दहा टिप्स

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. माझ्याकडून पूर्वी डॉट नेट शिकून गेलेला एक जण काही अन्य कारणासाठी आला होता. बोलता बोलता डॉट नेट विषयीच्या वेब साईटस, ब्लॉग्स याविषयी विषय निघाला. त्याच्याशी बोलताना सहज लक्षात आले की मी ब्लॉगींग करायला सुरवात करून दहा वर्ष झाली आहेत. 2000 साली सुरू झालेले ब्लॉगींग विषय, भाषा, तंत्रज्ञान बदलले तरी चालूच आहे. सुरवात झाली VB-ASP ने. मग Microsoft .NET आणि मग त्याच्या जोडीला योग-अध्यात्म. त्यासंबंधीच्या अनेक जुन्या आठवणी मनःपटलावर परत ताज्या झाल्या.

दहा वर्षे हा काळ वैश्वीक कालगणनेच्या दृष्टीने नगण्यच आहे. अगदी मनुष्यप्राण्याच्या आयुष्याच्या दृष्टीने विचार करताही हा काही प्रचंड असा कालावधी नाही. परंतू ब्लॉगींगच्या दृष्टीने पहाता तो बर्‍यापैकी मोठा म्हणता येईल कारण दहा वर्षांपूर्वी ब्लॉगींगभोवती आजच्यासारखे वलय नव्हते. मला वाटतं लाईव्ह जरनल, गुगलचे ब्लॉगर अशा ब्लॉगींग साईटस 1998-99 च्या दरम्यान कधीतरी चालू झाल्या. मुव्हेबल टाईप ब्लॉगींग सॉफ्टवेअर 2001 साली मधे तर वर्ड प्रेस सॉफ्टवेअर 2003 साली आले. टाईप पॅड 2003 मधे तर वर्ड प्रेस ब्लॉग होस्टींग 2005 च्या सुमारास सुरू झाले. तेव्हा 2000 साली ब्लॉगींग अगदीच बाल्यावस्थेत होते हे उघडच आहे.

खरंतर या दहा वर्षांचे धावते वर्णन करण्याचा विचार होता पण सगळ्यांनाच काही त्यामधे रस असेल असे नाही म्हणून नाही लिहिले. या दहा वर्षांत जे काही लेखन सुरू ठेऊ शकलो त्यात माझ्या वाचकांचा (अर्थात तुम्हा सर्वांचा) सिंहाचा वाटा आहे. वाचकांमुळेच लिहिणारा खर्‍या अर्थाने लेखक बनत असतो. तेव्हा वाचकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. अजुन किती काळ ब्लॉगींग करीन ते माहीत नाही पण आशा आहे की यापुढेही वाचकांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा असाच मिळत राहील.

तंत्रज्ञानासंबंधीच माझ लेखन अर्थातच इंग्रजीमधून आहे. योगमार्गाविषयी लिहिण्याची सुरवात झाली ती ही इंग्रजीमधूनच. मला वाटतं साधारण दिड वर्षांपूर्वी मराठीतूनही लेखन चालू केले. आज बरेच ब्लॉग्स मराठीतून लिहिले जात आहेत. दिवसें दिवस मराठी ब्लॉगर्सची आणि वाचकांची संख्याही वाढते आहे ही नक्कीच आनंदाची बाब आहे. नजिकच्या काळात मराठी ब्लॉगर्स कम्युनिटी अधिक सुदृढ, व्यापक आणि समृद्ध बनेल अशी खात्री वाटते आहे.

या दहा वर्षांना धन्यवाद देण्यासाठी घटस्थापना ते दसरा या दहा दिवसांत रोज एक अशा दहा ब्लॉगींग टिप्स देण्याचा मानस आहे. ब्लॉग कसा सुरू करावा, ब्लॉगर चांगलं की वर्डप्रेस, ब्लॉगचा वाचकवर्ग कसा वाढवावा, ब्लॉगद्वारे आर्थिक उत्पन्न कसे मिळवावे वगैरे गोष्टींबद्दल मी काही सांगणार नाही. इंटरनेटवर त्याविषयी अक्षरशः ढिगभर माहिती उपलब्ध आहे. मी सांगणार आहे अशा काही गोष्टी ज्या प्रदिर्घ काळ ब्लॉगींग करू इच्छिणार्‍या आणि त्यातून आनंद प्राप्त करण्याची इच्छा असणार्‍या ब्लॉगर्सना उपयोगी पडू शकतील.

पहिल्या टिप ने सुरवात करूया.

1. ब्लॉगची थिम ठरवा आणि पाळा

ब्लॉग लिहायचा असे ठरवल्यावर प्रथम ब्लॉगची थिम निश्चित करा. येथे मला ब्लॉगर अथवा वर्डप्रेसच्या टेम्प्लेटची थिम अभिप्रेत नाही. ब्लॉगच्या विषयाची थिम असे मला अभिप्रेत आहे. ब्लॉग Horizontal, Vertical किंवा Personal असु शकतो. (अर्थात पोर्टल्सप्रमाणे ब्लॉगच्या बाबतीत असे वर्ग़ीकरण साधारणतः केले जात नाही कारण ब्लॉग हा शेवटी एका व्यक्तीशी निगडीत असतो. येथे मी हे शब्द केवळ माझे म्हणणे नीट कळावे म्हणून वापरले आहेत.) Horizontal ब्लॉग हा कोणत्याही विशिष्ठ विषयाला वाहिलेला नसतो. त्यावरील नोंदीना विषयांचे बंधन नसते. उदाहरणार्थ जर रोजच्या समाज जीवनात घडाणार्‍या सरमिसळ गोष्टींचे विश्लेषण तुम्ही तुमच्या ब्लॉगद्वारे करत असाल तर तो झाला Horizontal ब्लॉग. जर तुमचा ब्लॉग केवळ क्रिकेट या विषयासंबंधीच्या घटना आणि माहिती प्रस्तुत करत असेल तर तो झाला Vertical ब्लॉग. जर तुमचा ब्लॉग सरसकट सर्व प्रकारच्या "कथा" प्रकाशित करत असेल तर तो झाला Horizontal ब्लॉग पण तो जर फक्त रहस्यकथा प्रकाशित करत असेल तर तो झाला Vertical ब्लॉग. जर तुमचा ब्लॉग Horizontal या सदरातला असेल तर तो small fish in big pond बनण्याचा धोका असतो. कारण अनेक जण तुम्ही ज्या विषयावर लिहित आहात त्याच विषयावर लिहित असतात. जर तुमचा ब्लॉग Vertical असेल तर तो big fish in small pond बनु शकतो. आता काय बनायचे हा सर्वस्वी ब्लॉग लेखकाच्या आवडीचा भाग आहे. एक चांगला आणि दुसरे वाईट असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. तरीही असे म्हणता येईल की ब्लॉगसाठी एक मुख्य विषय आणि दोनेक उपविषय असतील तर तो वाचकांच्या मनावर जास्त प्रभावीपणे आपला ठसा उमटवू शकतो. या थिमचा अजुन एक फायदा असा की लेखक आपले मन एका विषयावर केंद्रित करू शकतो ज्यामुळे नोंदी जास्त दर्जेदार बनतात. सर्वच विषयांमधे लेखकाला प्राविण्य असत नाही त्यामुळे सरधोपटपणे सर्व विषय हाताळले तर काही नोंदी अभ्यासपूर्ण आणि काही उथळ असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे ज्या विषयात आपल्याला तितकीशी सखोल जाण नाही असे विषय टाळलेलेच बरे. जर तुम्हाला दोन पुर्णतः भिन्न थिम्सबद्दल लिहायचे असेल तर एकाच ब्लॉगवर दोनही थिम्स हाताळण्यापेक्षा दोन वेगवेगळे ब्लॉग बनवलेलेच उत्तम. Personal ब्लॉग म्हणजे असा ब्लॉग की जेथे वाचक काय लिहिलय पेक्षा कोणी लिहिलय याला महत्व देत असतो. अशा ब्लॉग्सवर लिहिणारी व्यक्ती जास्त महत्वाची असते ती काय विषय हाताळत आहे त्याला दुय्यम स्थान असते. अशा ब्लॉगचे वाचक साधारणतः त्या लेखकाचे "फॅन्स" किंवा "फ्रेंडस" असतात. साधारणतः एखादा अभिनेता, लोकप्रिय खेळाडू किंवा राजकिय पुढारी यांचे ब्लॉग्स या सदरात मोडतात.

ब्लॉगचे वरीलप्रकारे वर्गीकरण हे ढोबळमानानेच करता येते. आपल्या वाचकांचा प्रतिसाद कसा आहे त्याची मधूनमधून चाचपणी करणे आणि त्यानुसार निर्णय घेणे योग्य राहील.


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+

Posted On : 08 Oct 2010


Tags : संगणक आणि इंटरनेट

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates