Untitled 1

ब्लॉगींग टिप 7 : प्रतिक्रिया देण्या-घेण्यात तारतम्य बाळगा

बहुतेक ब्लॉग्सवर नोंदीवर प्रतिक्रिया देण्याची सोय असते. जर तुमचा ब्लॉग लोकप्रिय असेल तर प्रतिक्रिया आणि त्यांचे moderation यात तुमचा बराच वेळ खर्ची पडू शकतो. प्रतिक्रियांद्वारे Interactivity हे जरी ब्लॉगचे महत्वाचे वैशिष्ठ असले तरी अशी देवाण घेवाण केलीच पाहिजे असे कडक बंधन अजिबात नाही. अनेक ब्लॉग इंजिन्समधे प्रतिक्रियांची सोय बंद करता येते. Interactivity अन्य मार्गांनीही साधता येते जसे Rating किंवा Like/Recommend सारख्या सुविधा. जर तुम्ही प्रतिक्रियांची देवाण घेवाण करत असाल तर त्यामधे तारतम्य बाळगणे आवश्यक ठरते.

प्रतिक्रिया देताना तुम्ही प्रतिक्रिया का देत आहात त्याचा क्षणभर विचार करा. प्रतिक्रिया देताना केवळ "छान आहे" वगैरे एक दोन शब्द लिहिण्यापेक्षा नोंद छान का आहे, तुम्हाला नोंदीचा कोणता भाग आवडला ते थोडक्यात लिहा. केवळ स्वतःच्या ब्लॉगची प्रसिद्धी व्हावी म्हणून "प्रतिक्रिया मशीन" बनू नका. प्रतिक्रियांद्वारे मतभेद प्रदर्शीत करताना सभ्यतेच्या मर्यादा पाळा. ब्लॉग हा युद्धभुमी नसून व्यासपीठ आहे हे लक्षात असु द्या. फार वर्षांपूर्वी टिव्हीवर एक जाहिरात लागत असे. बसमधील एक प्रवासी सहप्रवाशाला धक्काबुक्की करून जागा बळकावतो आणि जाहिरात सांगते - "शैतान बनना आसान है पर क्या इंसान बने रहना इतना मुश्किल है?" हेच तत्व प्रतिक्रिया देतांना लक्षात ठेवा. एखाद्याची टिंगलटवाळी करणे,  शिव्याशाप देणे, कावळ्यासारखे टोचून बोलणे फार सोपे असते. त्याला फारशी अक्कल लागत नाही. दुसर्‍याची भुमिका शांतपणे समजावून घेणे आणि गरज पडल्यास खिलाडूवृत्तीने ती स्विकारणे हे महत्वाचे असते. तुम्ही जशा प्रतिक्रिया इतरांना देत आहात तशाच प्रतिक्रिया तुम्हाला दिल्या तर कसे वाटेल याचा विचार करा. जर एखादा लेखक तुमच्या सुचनांची दखल घेत नसेल वा त्यांबद्दल नाराजी व्यक्त करत असेल तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. जर एखाद्याला तुमच्या सुचनांमधे रस नसेल तर तुमचे शब्द वाया घालवण्यात काय अर्थ आहे? अशावेळी शांतपणे प्रतिक्रिया देण्यापासून दूर रहा.

आता प्रतिक्रिया घेण्याविषयी. एक लक्षात ठेवा की जर तुम्ही प्रतिक्रिया स्विकारायचे ठरवलेत तर तुम्ही वाचकाला प्रतिक्रिया देण्याचा "अधिकार" देत असता. हा अधिकार दिल्यानंतर मग चांगल्या आणि वाईट दोनही प्रकारच्या प्रतिक्रियांना खुलेपणाने तोंड देण्याची तुमची तयारी हवी. प्रतिक्रियांचे moderation तुम्ही करू शकता ज्यामुळे प्रतिक्रिया प्रकाशित होण्यापूर्वी तुमची संमती आवश्यक ठरेल. प्रतिक्रिया देण्याबाबतचे नियम ब्लॉगवर स्पष्टपणे नमुद करा. जर एखादा वाचक या सोयीचा दुरुपयोग करत असल्यास त्याच्या नोंदी वगळण्याचा वा त्याचा IP ब्लॉक करण्याचा अधिकार अर्थातच तुम्हाला आहे.  मिळालेल्या प्रत्येक प्रतिक्रियेवर उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. जर वाचकाने काही प्रश्न केला असेल तर त्याचे उत्तर द्या पण प्रत्येक प्रतिक्रियेला वेगवेगळा "धन्यवाद" दिलाच पाहिजे असे नाही. धन्यवाद द्यायचेच असतील तर अनेक प्रतिक्रिया साठल्यावर मग सगळ्यांना एकदाच "धन्यवाद" देऊ शकता.


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+

Posted On : 14 Oct 2010


Tags : संगणक आणि इंटरनेट

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates