Untitled 1

ब्लॉगींग टिप 4 : ब्लॉगवर आपली ओळख जरूर द्या

ब्लॉग हा खरेतर तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख असतो. अनेकदा ब्लॉगर्स "About" किंवा "माझ्या विषयी" पानावर स्वतःविषयी काहीतरी काव्यमय वा गमतीदार लिहितात. जर ब्लॉग लेखकाला तसे लिहायचे असेल तर जरूर लिहावे पण त्याबरोबर स्वतःची खरी ओळखही द्यावी. त्याने तुमच्या ब्लॉगला authenticity येते. लक्षात ठेवा की वाचकाला काय लिहिलय या बरोबरच कुणी लिहिलय यातही रस असतो. साधारणतः मराठी घरांमधून "विद्या विनयेन शोभते" वा "स्वतःविषयी फार बोलू नये" असे बाळकडू मिळालेले असते. त्यात काही चुक आहे अशातला भाग नाही पण इंटरनेट युगात तुम्ही पूर्णतः अपरिचित अशा वाचकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करत असता. त्यांना तुम्ही कोण हे तुम्ही स्वतः सांगितल्याशिवाय कळणे शक्य नसते. तेव्हा तुम्हाला स्वतःविषयी बोलणे भागच असते. जर तुम्हाला स्वतःविषयी काय लिहायचे असा प्रश्न पडत असेल वा संकोच वाटत असेल तर एखाद्या जवळच्या मित्राला वा परिचीताला तुमच्या विषयी लिहिण्यास सांगावे.

काही वेळा ब्लॉग लेखकाला असे वाटते की मी एक साधा नोकरदार माणूस. स्वतःविषयी सांगण्यासारखे काय आहे माझ्याकडे? किंवा मी एक गृहिणी मी काय लिहिणार स्वतःविषयी? हे तितकेसे बरोबर नाही. परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही गुण दिलेले आहेतच. एकही गुण नाही सर्व दोषच किंवा सर्व गुणच एकही दोष नाही असा माणूसच अस्तित्वात नाही. तुम्हाला त्या आयुर्वेदाचार्यांची गोष्ट माहित आहे का? एकदा एका आयुर्वेदाचार्यांनी एका शिष्याला पढवून तयार केले. गुरूदक्षिणा देण्याची वेळ आली. ते शिष्याला म्हणाले, "जा! जंगलातून अशी एक वनस्पती शोधून आण जीच्यात काहीही औषधी गुणधर्म नाहीत" तो शिष्य दिवसभर जंगलात फिरला आणि संध्याकाळी निराश होऊन परत आला. गुरूजींना म्हणाला, "मला माफ करा. मला एकही वनस्पती अशी आढळली नाही जीचा काहीच औषधी उपयोग नाही." त्यावर गुरूजी उत्तरले, "शाब्बास! मी दिलेले ज्ञान तुला अगदी व्यवस्थित समजले आहे."

तर सांगायची गोष्ट ही की प्रत्येकाकडे काहीतरी चांगल्या गोष्टी असतातच. शिवाय या ओळखीचा उद्देश एक माणूस म्हणून (वा त्या विषयाच्या क्षेत्रातील तज्ञ म्हणून) तुम्ही कोण आहात हे वाचकाला कळावे एवढाच मर्यादीत असतो. त्या दृष्टीने एखादा परिच्छेद असला तरी पुरतो पण तो अवश्य असला पाहिजे. हा परिचय कोरड्या मुद्द्यांच्या स्वरूपात न देता वाक्यांमधे द्यावा. खालील उदाहरण पहा :

नाव : अ. ब. कडई
शिक्षण : इंजिनीयर
छंद : वाचन, चित्रपट संगीत एकणे

वरील प्रकारे निव्वळ "टेबल" देण्यापेक्षा तीच माहिती वाक्यांत द्या. उदा.

मी अ. ब. कडई. व्यवसायाने इंजिनीयर असून अमक्या अमक्या क्षेत्रात गेली 5 वर्षे कार्यरत आहे. दैनंदीन जीवनातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अमक्या अमक्या लेखकाच्या कथासंग्रहांचे वाचन करणे आणि बाल्कनीत आरामखुर्ची टाकून मस्तपैकी जुन्या चित्रपट गीतांचा आस्वाद घेणे हे माझे आवडते छंद.


सदा शिवचरणी लीन,
बिपीन जोशी

Stay updated : Twitter  Facebook  Google+

Posted On : 11 Oct 2010


Tags : संगणक आणि इंटरनेट

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.

  

Receive Weekly Updates